पहिला पाऊस आला की वाट एकदम निसरडी होऊन जाते . किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा वाटेवरची आपली पकड ढिली होते ..
अश्याच निसरड्या क्षणी
मी घरातून बाहेर पडतो.
हळूच.
एकटाच.
हलक्या सरी
ढग आणि वाऱ्याचा खेळ
बघत अनुभवत
शहराच्या बाहेर येतो .
तसा पाऊस वाढतो..
भिजायचं का नाही?
हे ठरवता येत नाही
म्हणून मी थांबतो.
चहा सांगतो.
चहाचा गरम cup किंवा
गरम चहाचा cup
हातात पकडून उभा राहतो.
पत्र्यावरून पडणारा पावसाचा एकेक थेंब पाहत.
चहा गार झाल्याची जाणीव होते
आणि एकदम चहा संपवतो.
“जाणिवाच बोथट झाल्यात
त्यात चहाचा काय दोष ?”
स्वतालाच सांगतो.
पैसे देऊन निघतो.
‘ती ’ची आठवण प्रकर्षानी टाळतो.
प्रकर्ष , उत्कर्ष , हर्ष असल्या जाणीवही टाळतो . .
माझ्यातल्या एका मलाच
मागे टपरीपाशी ठेवून
मी पुढे निघतो ....
नेहमी प्रमाणे bike वर उजव्या बाजूने बसतो.
वातावरणात एक नाविन्य भरलेले असते
म्हणूनच जुन्या आठवणीत जायचे नसते
मागच्याच आठवड्यात उघडे बोडके डोंगर
पूर्णपणे हिरवाईत नटलेले
माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
विश्वास अविश्वास श्वास भास
असल्या खेळात एका मला
मागे ठेऊन पुढे निघतो ....
शाळेच नवीन वर्ष सुरु झालेले असतं.
मुलाप्रमाणे पक्षी सुद्धा नवीन पानांचा
वास घेण्यात गर्क असतात.
शाळा भरायच्या आधीची पोरांची किलबिल
पक्ष्यांच्या गोंधळाला पार फिके पडत असते.
हे सगळे एकट्यानीच बघताना
एक छोटासा हसू कधी येत मला कळत नाही.
असं वाटत मनसोक्त photo काढावेत
पण हे क्षण जगायचे असतात
Camerat बंद करायचे नसतात .
माझ्यातल्या अजून एका मला
कसलाही विचार करायला न लावता
फक्त खेळ बघत उभा करून
ते हसू चेहऱ्यावर तसंच ठेऊन
मी पुढे निघतो.
आपल्या अपेक्षेपेक्षा वाटेवरचा आपला ताबा गेला कि आपण त्याला निसरडी वाट म्हणतो
माझ्या अपेक्षेपेक्षा माझा माझ्यावरच ताबा जातो आहे . स्पष्ट पणे जाणवत आहे
तरी सुद्धा काहीच जाणवत नाही असं मी दाखवत असतो .
ह्या अपेक्षाच सगळ्या घोळ करतात.
मागे सोडलेल्या तिघांना
परत घेऊन
कुठे घसरून न पडता,
मी घरी पोचतो.
माझ्यातल्या प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा.
माझा माझ्यावरच ताबा जातो..
ह्या अनुभवांना मी पारखा होऊ इच्छित नाही.
म्हणून केलेला एक
केविलवाणा प्रयत्न.
अगदी
निसरडा ...
No comments:
Post a Comment