मावळतीला मेघ पेटले
रवी तरीही निश्चल ,
चिता सोबत्यांच्या लागल्या
अश्रू तरीही अचल .
धरणी येता काकुळतीला
सागर मागे क्षमायाचना ,
तसू भरही न ढळे आदित्याची
अतिदिव्य अग्निसाधना .
रूप बदलूनी गुलमोहर बहावा
उभा करी सुंदर देखावा ,
उमदे देखणे रूप परी
हरित पर्णाशी कसला दुरावा .
मृग नक्षत्राचा फुलता पिसारा
सुखावे अवघी सृष्टी ,
सांध्यक्षणी तो सोसाट वारा
अधू करीतसे माझी दृष्टी .
आकाश सोबती दाटून येती
लपून जाई अखंड निळाई ,
क्षणात समजे खेळ सारा
जशी काही वीज चमकावी .
पोचता जलधारा जमिनीवरी
मीलन होई आसमंताशी ,
सागरा येईये आनंद उधाण
हलकेच तरीही पाझरे पाषाण .
सांज सकाळी कधी अवेळी
हिरमुसलेल्या एकांतवेळी ,
मीच माझ्याशी
उन पाऊसाचा खेळ खेळी.
No comments:
Post a Comment