Friday, April 13, 2012

वेळ

रात्री  2.15 ची  वेळ .
अमावास्या आहे. आत्ताच घरी आलोय. रस्ते एकदम मोकळे होते. उशिरापर्यंत जागणारे बहुतेक झोपायला गेलेत आणि लवकर उठणारे अजून जागे व्हायचेत. रात्री 2 ते 3.30 ची वेळ अशी विचित्रच असते. अतिशय एकांताची वेळ असते ही. शेवटच्या खोलीत बसलोय. खिडकीतून, पडदा जसा हलेल तसा  मोकळा रस्ता दिसतोय. पिवळा प्रकाश, park केलेल्या cars आणि अंगाचे मुटकुळ करून झोपलेली कुत्री. साधारणपणे 11 महिन्यांनी  “Bean Book” उघडली आहे. आणि हातातल्या पेनाशी चाळा.

रात्री  2.30 ची  वेळ .
निर्विघ्न
निर्विकार
निर्जन
निर्मम
निराश
निर्लज्ज
निश्चित
निस्वार्थी
निस्तब्ध
निशब्द
                  वेळ




रात्री  3.00 ची  वेळ.
1. वेळेनी स्वतःसाठी राखून ठेवलेली वेळ.
2. अगदी विश्रांती घेणं शक्य नाही, पण मुंगीच्या वेगानी पावलं टाकत जाणारी वेळ.
3. कुणाला, कधी, कुठे, कसा आणि किती
    वेळ द्यायचा 
    ह्याचा विचार करत असते वेळ.
4. वेळेची गणितं 
    काळाच्या पडद्यावर 
    काम आणि वेग 
    ह्यांच्याशी न जोडता 
    मनाच्या कोपर्यात सोडवण्याची वेळ.
5. चंद्र आणि सूर्य 
    दोघांनी एकमेकांसाठी 
    एकांतात
    राखून ठेवलेली वेळ  (अमावास्या  आहे)
    आणि पहार्यावर   
     लाखो चांदण्या 
6. पाण्यानी आवाज न करता         वाहण्याची वेळ
    वार्यांनी पाने न हलवता              जाण्याची  वेळ
    जमिनीने कुशीत                        घेण्याची  वेळ .

वेळेनी स्वतःसाठी राखून ठेवलेली वेळ.

Friday, April 6, 2012

पश्चिम

विचार करतोय,
एक घर बांधावं,
पश्चिमेला.

अगदी टोकाला,
समुद्र किनारी.

म्हणजे
सूर्यास्त होताना,
झाड, डोंगर, बिल्डिंग, वायर
काही काही मध्ये येणार नाही.
अगदी शेवटच्या  क्षणापर्यंत
बघता येईल,
त्याच्या कडे,
डोळे भरून.


एक खिडकी पण करेन,
आईच्या वाढदिवसाला,
सूर्याचा अगदी शेवटचा किरण सुद्धा बेडवर पडेल अशी.
अगदी झोप लागेस्तोवर उब मिळेल.
तिच्या कुशीत असते तशी.

विचार करतोय,
एक घर बांधावं,
पश्चिमेला.

अगदी टोकाला,
समुद्र किनारी.
विचार करतोय.


म्हणजे
चंद्रास्त होताना,
झाड, डोंगर, बिल्डिंग, वायर
काही काही मध्ये येणार नाही.
अगदी शेवटच्या  क्षणापर्यंत
बघता येईल,
त्याच्या कडे,
डोळे भरून.



एक खिडकी पण करेन,
प्रत्येक पौर्णिमेला,
अगदी शेवटपर्यंत चंद्र दिसेल अशी.
अगदी झोप लागेस्तोवर 'ती'ची आठवण येईल
'ती' असताना कधीच येत नव्हती तशी.



विचार करतोय,

एक घर बांधावं,

पश्चिमेला 


.