Monday, June 11, 2012

येताना


तो आणि पाऊस 
तसे एकत्रच आले.
नेहमीप्रमाणे, 
वाटलं होतं त्यापेक्षा 
2 दिवस आधीच.

कधीही आला  तो
तरी,
‘दोनो हाथ फैलाके’
भेटते त्याला,
डोळे मिटून 
त्याच्या मिठीत ..

पहिल्या भेटीतली त्याची ओढ.
ते वाहत्या वार्या बरोबरचं भटकणं.
सालाबाद प्रमाणे, दरवर्षी येणाऱ्या...
पण 
दरवेळेस नवीन आनंद देणाऱ्या गोष्टी ...


त्याला अक्षरशः उधाण आलेलं असतं,
सगळं काही अगदी पहिल्याच भेटीत 
दाखवायचं असतं त्याला.

मी मात्र,
उजव्या तळहातावर हनुवटी ठेवून,
शांत,
एकटक, 
त्याच्याकडे बघत बसते.

एकाग्र चेहऱ्यावर माझ्या 
मध्येच चार थेंब उडवतो,
“अशी एकटक बघू नको,
नजर लग जायेगी”.

एखादी वीज चमकावी 
तसा तो उठून उभा राहतो,
माझ्या जवळ येऊन म्हणतो 
‘आता मी आलोय न!’

गरम चहा दिला त्याला 
कि 
क्षणभरासाठी आलेल्या सूर्याला,
परत ढगांखाली लपवून 
बरसायला तो मोकळा.

चारच महिन्यांचा 
हा सहवास त्याचा,
पुढच्या भेटीपर्यंत प्रत्येक अनुभव जिवंत ठेवणारा 
ओलावा त्याचा.

उगाच कधीतरी, 
मार्च एप्रिल मध्ये phone केल्यासारखा, 
एक क्षण बरसून जातो,
त्याच्या आठवणींचा मोहोर मात्र 
ताजा करून जातो.

दरवर्षी असं होतं... 
दरवर्षी तो मला भेटतो.
चार महिन्यात निघून जातो.
‘आता आलोय न’
हे शब्द मात्र 
“नैना लागीय बारीशा”
म्हणत परत त्याचीच आठवण करून देतात.

तो आणि पाऊस
तसे एकत्रच आले.

1 comment: